UPSC मी आणि तुम्ही : प्रस्तावना



प्रस्तावना





1) UPSC मी आणि तुम्ही : मनोगत


2) UPSC मी आणि तुम्ही : 1st Chapter 

3) UPSC मी आणि तुम्ही : 2 CHAPTER 

4) UPSC मी आणि तुम्ही : 3rd CHAPTER

5) UPSC मी आणि तुम्ही : 4th CHAPTER



6) UPSC मी आणि तुम्ही : 5th CHAPTER

अन्सर शेख पहिल्या प्रयत्नात, 21 व्या वर्षी, मराठी माध्यम घेऊन आयएएस (IAS) सामना अधिक महत्त्वाचे आहे. भारतात जात, वर्ग, लिंगभाव, धर्म, प्रदेश, भाषा, इ. घटकांवर आधारित अत्यंत गुंतागुंतीचे, परस्पर व्याप्त आणि विषम स्वरूपाचे समाजवास्तव आहे. या विषम वास्तवाने अनेक समाजघटकांना किमान पातळीवरील जीवन जगण्यासाठी आवश्यक क्षमता आणि संधी यांपासून वंचित ठेवले आहे. परिणामी, त्यांना अनेक दुर्बलतांचा (Disabilities) सामना करत कुंठितावस्थेतील जीवन जगावे लागते.

 

मराठवाड्यासारखा मागास विभाग, (जालना जिल्हा, शेलगावसारखे छोटे गाव) आणि मुस्लिम समुदायातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास स्तरातून आलेला अन्सार जणु या घटकांचे प्रातिनिधिक रूपच आहे. अशा दुर्बल घटकांतील व्यक्तीला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून जगण्यासाठीच तीव्र संघर्ष करावा लागतो. जिथे जगण्यासाठीचा संघर्षच ऐरणीवर असतो तिथे शिक्षण घेणे, उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणे आणि प्रशासकीय अधिकारी व्हायचे ठरवणे ही गोष्ट स्वप्नवतच. अन्सारने असे पाहिले आणि या स्वप्नालाच आपल्या जीवन संघर्षाचे अविभाज्य अंग बनवले. भोवतालची व्यवस्था प्रतिकूल असून देखील न डगमगता अन्सारने इथपर्यंत केलेला हा प्रवास (नागरी सेवेबरोबरच विविध क्षेत्रात  प्रतिकुलतेवर  मात करून यश मिळवलेल्या थोडक्या व्यक्तींप्रमाणे) अपवादात्मक ठरतो; म्हणून तो जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते.

 

भारताचा स्वातंत्र्यलढा, त्यातून पुढे आलेली लोकशाही, कल्याणकारी व समावेशक व्यवस्थेची दृष्टी, आंबेडकरांच्या द्रष्ट्या (Visionary) नेतृत्वाखाली आकारास आलेले संविधान आणि स्वतंत्र भारताचा सुरू झालेला प्रवास या आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे समाजातील दुर्बल, वंचित आणि शोषित घटकांसाठी आशेचा किरण निर्माण झाला. अर्थात, स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे उलटून गेली असली तरी व्यवस्था परिवर्तनाची वाटचाल अत्यंत संथ गतीने सुरू आहे. राज्याद्वारे हाती घेतलेले कल्याणकारी उपाय आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे विकासाच्या संधी निर्माण होत असल्या तरी त्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. उदारीकरणाच्या काळात तर या परिस्थितीने तीव्र स्वरूपाच्या विषमतेचे रूप धारण केले आहे. तथापि, या प्रतिकूल वास्तवातही इथल्या लोकशाही अवकाशाने सार्वजनिक जीवनातील काही क्षेत्रात तरी दुर्बल घटकांतील (किमान काही व्यक्तींच्या सहभागाची शक्यता अबाधित ठेवली आहे. नागरी सनदी सेवा हे त्यातीलच एक क्षेत्र होय. कोणत्याही शाखेचा, नियमित वा बाह्य पदवीप्राप्त, त्यातही केवळ उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतो आणि खुल्या स्पर्धेद्वारा आयएएस, आयपीएस इ. प्रशासकीय पदे प्राप्त क शकतो. म्हणूनच अन्सारसारखा विद्यार्थी जो आपल्या कुटुंबातील पहिलाच दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर, ज्याची आर्थिक स्थिती ही व्यावसायिक शिक्षणाची दारे प्रतिबंधित करणारी आणि ज्याच्याकडे सांस्कृतिक भांडवलाचा कसलाच बारसा नव्हता; तो नागरी सेवांच्या खुल्या स्पर्धात्मक स्वरुपामुळे आणि निव्वळ आपल्या मेहनतीच्या बळावर आयएएस पदापर्यंत पोहोचू शकला.



अन्सार ज्या सामाजिक-आर्थिक स्तरातून आला आहे, ती परिस्थिती असंख्य अडथळे निर्माण करणारी होती. बडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर असल्याने (म्हणजे हलाखीची आर्थिक स्थिती असल्याने) शिक्षणाचा मार्ग वाट्याला येईल की नाही हे अनिश्चित होते आणि आलेच तर ते कुठपर्यंत परवडेल याची खात्री नव्हती. त्यामुळे त्याला उत्तम शैक्षणिक सुविधा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. कुटुंबात याआधी कुणी शिकलेले नसल्याने शिक्षणाचे महत्त्व पटून पुढच्या पिढीसही शिक्षण दिले पाहिजे, असा आग्रह धरणारेही कुणी नव्हते. परिणामी काय शिकावे, कसे शिकावे याचे मार्गदर्शन उपलब्धच नव्हते. वेगवेगळ्या कारणांमुळे कौटुंबिक पातळीवर ताण-तणाव असल्याने एखाद्या मुलाच्या विकास प्रक्रियेमध्ये जे मानसिक स्वास्थ्य व स्थैर्य लागते त्याचाही अभाव होता. अशा स्थितीत एखादे उच्चतम ध्येय निश्चित करणे दुरापास्तच होते. कारण त्यासाठी लागणारे सामाजिक, आर्थिक वा सांस्कृतिक असे कोणतेच भांडवल त्याच्या पाठिशी नव्हते.

 

अन्सारने या अभावग्रस्ततेतूनच उत्तर शोधले. प्रतिकूल परिस्थितीस शरण न जाता तिच्यावर मात करण्याचीच धडपड सुरू केली आणि उत्तर शोधले ते शिक्षणाच्या रूपात जिल्हा परिषदेच्या शाळेतून या प्रवासास सुरुवात झाली. लहानपणापासूनच वाचनाची आवड जडलेला अन्सार सहृदय शिक्षकांच्या नजरेत' आला नसता तर नवलच! हलाखीच्या परिस्थितीमुळे अन्सारचे शिक्षण थांबवण्याच्या निर्णयापर्यंत आलेल्या वडिलांचे मनःपरिवर्तन करण्याचे काम या सहृदय शिक्षकांनीच पार पाडले. परिणामी त्याचा शैक्षणिक प्रवास खंडीत न होता सुरुच राहिला आणि याचे पहिले दृश्य फलित त्याच्या दहावीच्या निकालाच्या (76% गुण) रूपात दिसून आले. एकाअर्थी हा निकाल त्याच्या जीवनातील 'टर्निग पॉईंट' ठरला. दहावीत चांगले गुण प्राप्त झालेले विद्यार्थी सर्वसाधारणतः विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. अन्सारने हा रुळलेला मार्ग न चोखाळता जाणीवपूर्वक कला शाखेत प्रवेश घेतला. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला चांगल्या महाविद्यालयात पदवी शिक्षण घ्यायचे आणि त्यासाठी 12 वीत उत्तम गुण प्राप्त करायचे असा निर्धार केला. या उद्दिष्टाने प्रेरित होऊन दोन वर्षे भरपूर मेहनत घेतली आणि 12 बीतही उत्तम गुण (91%) प्राप्त केले अन्सारच्या प्रवासातील हे दुसरे महत्त्वपूर्ण वळण ठरले, ज्यामुळे त्याचा पुढील मार्ग सुकर झाला.

 

बी.ए.च्या प्रथम वर्षातील प्रवेशाने अन्सारच्या निर्णायक टप्प्याची सुरुवात झाली. पुण्यासारख्या नव्या शहरात आणि फर्ग्युसनसारख्या महाविद्यालयात रुळण्यातच पदवीचे पहिले वर्ष सरले. या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन महाविद्यालयीन जीवनाचा आस्वाद घेतला. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले तरी युपीएससी अथवा एमपीएससी करायचे की एसटीआय-पीएसआयची तयारी करायची, हे अजूनही पक्के ठरत नव्हते. विविध शिकवण्यावर्गाला दिलेल्या भेटीगाठी, मित्रांशी सल्लामसलत, यशस्वीताचे सत्कार कार्यक्रम आणि त्यांची मनोगते यामुळे गोंधळ वाढतच होता. प्रसंगी या 'जीवघेण्या स्पर्धेत आपण

 

टिकणारच नाही, असे नकारात्मक विचारही येऊ लागले. दुसऱ्या बाजूला कौटुंबिक पाठिंब्याच्या संदर्भात फारसे काही चांगले घडत नव्हते. किंबहुना, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक खर्च कसा भरून काढायचा हा यक्षप्रश्नच होता. परंतु पदवीचे पहिले वर्ष संपल्यानंतर काही मित्रांच्या साहाय्याने आणि स्वतः निर्धार करून युपीएससी करण्याचा निर्णय पक्का केला. त्यासाठी महाविद्यालयातील अभ्यासबाह्य उपक्रमांतील सहभाग थांबवण्याचे ठरवले. त्यादृष्टीने युपीएससीचा क्लास लावून पूर्णवेळ तयारीस सुरुवात केली.

 

जुलै 2013 मध्ये युनिक अॅकॅडमीतील एक वर्षाच्या समग्र (इंटिग्रेटेड) बॅचला प्रवेश घेऊन या खडतर प्रवासाचा आरंभ केला. जुलै बॅचचा एक विद्यार्थी म्हणून अन्सार मला पहिल्यांदा भेटला. सामान्य अध्ययन आणि राज्यशास्त्र वैकल्पिक विषयाच्या शिकवणी वर्गाच्या माध्यमातून हा संबंध अधिकाधिक दृढ होत गेला. यथावकाश त्याचे वर्गात प्रश्न विचारणे, क्लासनंतर त्या त्या विषयाच्या शिक्षकास भेटून चर्चा करणे यामुळे इतर शिक्षकांच्याही तो लक्षात येऊ लागला. क्लासच्या पहिल्या दिवशी संबंध वर्षभराचे नियोजन आणि अभ्यासाचे धोरण स्पष्ट केले जाते. त्यात युपीएससीचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, संदर्भ सूची आणि नियोजन या घटकांची चर्चा केली जाते. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची बाब सांगितली जाते. किंबहुना एक विनंतीवजा आवाहन केले जाते की 'निष्क्रीयपणे क्लासला हजेरी न लावता अत्यंत सजग, सक्रीयपणे क्लासला उपस्थित राहा आणि क्लासच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सर्व संसाधनांचा अधिकाधिक, रचनात्मक वापर करून घ्या. कारण तयारी विद्यार्थ्यांनाच करायची असते आणि क्लासची भूमिका ही चिकित्सक, मार्गदर्शक साहाय्यकाचीच असते, हे स्पष्टपणे सांगितले जाते. अन्सारने या आवाहनाचे तंतोतंत पालन केले, किंबहुना तो हे जगला. त्याच्या पहिल्या प्रयत्नातील यशाचे हे गमक

 

आहे! अन्सार युपीएससीत यशस्वी होणार, हे त्याच्या तयारीदरम्यानच ठळकपणे लक्षात येत होते. एखादा विद्यार्थी कशी तयारी करत आहे? ही तयारी योग्य दिशेने जाणारी आहे का? तयारीचे चिकित्सक मूल्यमापन करून त्यात सुधारणा केल्या जात आहेत का? या बाबी युपीएससीच्या तयारीत निर्णायक ठरतात. एखादा विद्यार्थी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतो ? कोणत्या अडचणी सांगतो ? पुढील भेटीत कोणते प्रश्न घेऊन येतो? यातून त्या-त्या विद्यार्थ्याच्या तयारीची स्थिती, एकंदर दिशा व गुणवत्ता लक्षात येते. अन्सारच्या संपूर्ण तयारी प्रक्रियेत – मग वर्गात विचारलेले प्रश्न असोत, क्लासनंतरची चर्चा असो वा लेखन करताना येणाऱ्या अडचणी असोत नवख्या विद्यार्थ्यांचे अडखळणे जसे होते तसेच तीव्र स्वरूपाची जिज्ञासू वृत्ती दिसून येत असे. त्याच्या या जिज्ञासू वृत्तीमुळे यूपीएससीचे एकेक आयाम लक्षात येऊ लागले. योग्य वेळीच (म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी 2 वर्षे आधी) या अभ्यासप्रक्रियेस सुरुवात केल्यामुळे त्याला परीक्षेचे विविध टप्पे, विषय, अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेण्यास पुरेसा वेळ मिळाला आणि परीक्षेच्या एकेका टप्प्यावर त्याला स्वतःच्या गरजेनुसार विशेष लक्ष केंद्रीत करता आले.

 

प्रास्ताविकाच्या सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे अन्सारने ज्या पद्धतीने अभ्यास केला, त्यातच त्यांच्या यशाचे रहस्य दडले आहे. युपीएससीची परीक्षा जशी व्यापक अभ्यासक्रमावर आधारित आहे, तशीच ती अत्यंत गतीशील स्वरूपाचीही आहे. त्यातील विविध विषयांच्या तयारीसाठी वर्तमानपत्रापासून संदर्भ पुस्तके ते

 

काही निवडक वेबसाईटचा वापर करावा लागतो. परिणामी, या परीक्षेचे स्वरूप लक्षात घेण्यास कित्येक महिने खर्ची घालावे लागतात. त्यामुळे या परीक्षेची तयारी केव्हा सुरू केली जाते आणि परीक्षेपर्यंत उपलब्ध असणारा कालावधी कशा रितीने उपयोगात आणला जातो ही बाब कळीची ठरते.

 

अन्सारच्या यशात पायाभूत ठरलेली पहिली बाब म्हणजे त्याने आखलेले योग्य नियोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी होय. क्लास आणि प्रत्यक्ष अभ्यासास सुरुवात झाल्यानंतर त्याच्या हे लक्षात आले की कॉलेज, सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयाचा अभ्यास एकाचवेळी सांभाळता येणार नाही. त्यामुळे त्याने वैकल्पिक विषयाच्या म्हणजेच राज्यशास्त्राच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला आणि सामान्य अध्ययनाचा अभ्यास त्यातील विविध विषय समजून घेण्यापुरताच मर्यादित ठेवला. या काळात राज्यशास्त्रावरच मेहनत घेतल्यामुळे (सुरुवातीच्या अभ्यासानंतर) पूर्व परीक्षा होईपर्यंत पुन्हा राज्यशास्त्राचा अभ्यास करावा लागला नाही. परिणामी, थेट पूर्व परीक्षेनंतरच्या 100 दिवसात राज्यशास्त्राकडे वळणे शक्य झाले. राज्यशास्त्रानंतर सामान्य अध्ययनाच्या (मुख्य परीक्षेच्या दृष्टीने) अभ्यासाकडे मोर्चा वळवला आणि त्यातील एकेक विषय पक्का करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात पदवीचे दुसरे वर्ष संपून शेवटच्या वर्षाची सुरुवातही झालेली होती. मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सामान्य अध्ययनाच्या चारही विषयांचे समाधानकारक वाचन झाल्यानंतर नोव्हेंबर 2014 पासूनच (म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये होऊ घातलेल्या पूर्व परीक्षेपूर्वी 9 महिने आधी) पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. अन्सारने पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी राखीव ठेवलेला हा कालावधी एखाद्याला अतिरिक्त वाटू शकतो. मात्र संपूर्ण भारतभरात असलेली तीव्र स्पर्धा, आपला पहिला प्रयत्न आणि पूर्व परीक्षेचे पहिला अडथळा म्हणून असणारे महत्व या बाबी लक्षात घेऊन त्याने जाणीवपूर्वक पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण परीक्षेच्या संदर्भात आपण नक्की कुठे उभे आहोत, हे योग्य रितीने ओळखल्यामुळेच अभ्यासाचे हे नियोजन आखता आले. एका बाजूला परीक्षेची गरज आणि दुसऱ्या बाजूला ही गरज पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज याच्या मिलाफातून विकसित केलेले नियोजन यशप्राप्तीत पायाभूत ठरल्याचे दिसून येते.

 

अर्थात, असे प्रभावी नियोजन आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे ज्या पायाभूत बाबीमुळे शक्य झाले, ती बाब म्हणजे त्याने या परीक्षेचे केलेले यथार्थ आकलन होय, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तीन टप्पे भिन्न स्वरूपाचे असून त्यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूपही वेगवेगळे असते. या प्रत्येक टप्प्यासाठी काही सर्वसाधारण क्षमता व कौशल्यांबरोबरच विशिष्ट क्षमताही विकसित कराव्या लागतात. त्यादृष्टीने आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचे आकलन आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे ठरते. अन्सारने ही प्रक्रिया अत्यंत सखोलपणे केलेली होती. या पुस्तकातील पुढील प्रकरणे वाचल्यानंतर याची खात्री पटते. परीक्षेतील तिन्ही टप्प्यांच्या योग्य आकलनामुळेच त्या त्या टप्प्याची खास गरज कोणती, हे नेमकेपणाने समजून घेता आले. अन्सारच्या एकंदर तयारीतील हा मुख्य घटक होता. त्याने प्रत्येक परीक्षेसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून त्या-त्या अभ्यासघटकावर मेहनत घेतली. पूर्व परीक्षा ही केवळ स्वतःच करावयाची बाब असून त्यासाठी करावा लागणारा अभ्यास 'व्यापक'ही आणि 'सखोल'ही असावा लागतो, याची त्याला पूर्ण जाणीव होती. प्रत्यक्ष तयारीत त्याने याची दक्षता घेतली.

हा अभ्यास गुणवत्तापूर्ण व्हावा, त्यातील जास्तीत जास्त भाग कायमस्वरूपी स्मरणात राहावा आणि परीक्षा नजीक आल्यानंतर महत्त्वाच्या बाबींची उजळणी करता यावी म्हणून स्वतःच्या मायक्रोनोट्स काढ त्यानंतर उजळणीचे वेळापत्रक करून त्याद्वारे अभ्यासाचे मजबुतीकरण केले आणि बहुपर्यायी प्रश्नांचा भरपूर सराव केला. केवळ उपलब्ध प्रश्नपत्रिकांपुरतेच मर्यादित न राहता मित्रांचा ग्रुप तयार करून त्याद्वारे स्वतःच प्रश्न तयार करण्याची पद्धती अवलंबली. एका अर्थी युपीएससीचे 'माईंड' ओळखण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण होते.



मुख्य परीक्षेच्या बाबतीतही अशाच प्रकारची अभ्यासपद्धती अवलंबली. पूर्व परीक्षा झाल्यानंतर लगेचच भेटून उपलब्ध 100 दिवसांचे वेळापत्रक बनवून तयारीस सुरुवात केली. वस्तुतः पूर्व परीक्षेच्या तयारी प्रक्रियेत सामान्य अध्ययनाचा व्यापक व सखोल अभ्यास झाल्यामुळे आता प्रश्न होता तो लेखन सरावाचा आणि महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या तयारीचा. राज्यशास्त्राच्या बाबतीत मात्र एका बाजूला दीड वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासाची उजळणी करणे आणि दुसऱ्या बाजुला लिखाणाचा सराव करणे असे दुहेरी काम होते. त्याखेरीज निबंध आणि नैतिकतेवरील पेपरचा लेखन सराव करायचा होता. या टप्प्यात देखील आपल्या तयारीची स्थिती आणि मुख्य परीक्षेची गरज लक्षात घेऊन 'आठवडी सराव चाचणीचे प्रारूप न स्वीकारता त्याने स्वतःच्या नियोजनाप्रमाणे निर्धारीत विषयांवरील प्रश्नांची उत्तरे तयार करण्यावर भर दिला. त्यानुसार दर दहा दिवसात लिहून झालेली उत्तरे युनिकमधील त्या त्या विषयांच्या शिक्षकांकडून तपासून घेण्यास सुरुवात केली. अशारीतीने, पूर्व परीक्षेनंतरच्या दोन महिन्यांमध्ये सर्वच विषयांवरील उत्तरांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे धोरण ठरवले. शेवटच्या महिन्यात वेळेच्या व्यवस्थापनावर जोर दिला. अशारीतीने म्हणजे तीन तासात संपूर्ण पेपर लिहून होईल, अशारीतीने समग्र सराव चाचण्या सोडवल्या. थोडक्यात स्वतःच्या गरजेनुसार, परंतु विचारपूर्वक ठरवलेले हे अभ्यासधोरण 'लेखनाचा दर्जा' आणि "वेळेचे व्यवस्थापन' या दोन्हीसाठी उपयुक्त ठरले. या लेखन सरावात जेवढे आशयाला महत्त्व दिले, तेवढेच भाषिक अभिव्यक्तिकडेही लक्ष दिले. शुद्धलेखन, विरामचिन्हे, व्याकरण, परिभाषा इथपासून ते मांडणीतील सुसंगती, संघटितपणा, प्रभावीपणा आणि नावीन्य अशा विविध अंगांनी लेखन कौशल्याचा सराव केला. त्याने शिक्षकांकडून मिळणाऱ्या चिकित्सक सुचनांवर वेळीच मेहनत घेऊन अपेक्षित सुधारणा करण्यावर भर दिला. अशारीतीने अन्सारला आपल्या सातत्याने विकसित होत जाणाऱ्या अभ्यासपद्धतीमुळे मुख्य परीक्षेचा चक्रव्यूह यशस्वीरीत्या भेदता आला.

 

मुख्य परीक्षा चांगल्यारीतीने लिहिता आल्यामुळे त्याच्यात 'आपल्याला मुलाखतीला बोलावले जाणार हा आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्य परीक्षेनंतर फारसा वेळ वाया न घालवता त्याने मुलाखतीच्या तयारीला जोमाने सुरुवात केली. त्यादृष्टीने जुन्या यशस्वी अयशस्वी विद्याथ्र्यांच्या आयोगाने घेतलेल्या मुलाखतीचे नमुने पाहून :च्या डॅफचे (Detailed Application Form) जणू डिसेक्शनच केले. फॉर्ममधील विविध घटक, उपघटक अधोरेखित करून त्यावरील संभाव्य प्रश्न उपप्रश्नांची यादीच तयारी केली. विविध संदर्भ पुस्तकांतून त्या त्या घटकावर पुरेशी माहिती गोळा करून त्याचे वाचन, उजळणी जशी केली तसेच त्यावर चिंतनही केले. युनिकच्या खास मुलाखतीसाठी सुरू केलेल्या वाचनालयात संबंधित पुस्तकांचे वाचन करून सखोल नोट्स बनवल्या. इस्लामवर विविधांगी प्रश्न येऊ शकतात, याचा

 

विचार करून त्यावरही अनेक संदर्भ पुस्तकांच्या आधारे माहिती संकलित केली. मध्य-पूर्वेचे राजकारण, दहशतवाद, मुस्लिम युवकांचे रॅडीकलायझेशन, समान नागरी कायद्याचा प्रश्न अशा संबंधित महत्वपूर्ण विषयांवरही मेहनत घेतली. वास्तविक पाहता, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी केलेल्या व्यापक अभ्यासामुळे मुलाखतीसाठी लागणारी भक्कम पायाभरणी आधीच झालेली होती. आता प्रश्न होता, व्यक्तीगत माहिती पत्रकातील प्रत्येक घटक आणि चालू घडामोडीविषयक तयारीचा अन्सारने मुख्य परीक्षेनंतर प्राप्त झालेला वेळ अत्यंत प्रभावीपणे वापरल्यामुळे मुलाखतीसाठी लागणारा आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रबळ आकांक्षा याचा वेळीच विकास साधता आला. व्यापक तयारीमुळेच एखाद्या प्रश्नावर काय बोलायचे ? त्यातून उपप्रश्न निर्माण झाले तर कोणती भूमिका घ्यायची? उलटतपासणी झाल्यास आपली बाजू कशी मांडायची? आपल्याला जे माहिती आहे आणि महत्त्वाचे वाटते ते पॅनेलसमोर कसे मांडायचे? अशा महत्त्वपूर्ण बाबींसाठी लागणारी क्षमता प्राप्त करता आली. मुलाखतीची पुरेशी तयारी झाल्यानंतर युनिकमध्ये जो मॉक इंटरव्यू दिला, त्यातून अन्सारच्या तयारीची गुणवत्ता लक्षात आलेली होती. पुढे मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दिल्लीत जाऊन ज्या अनेक अभिमत मुलाखती दिल्या, त्यातूनही आत्मविश्वास द्विगुणित झाला. शेवटी आयोगाने मुलाखतीत उत्तम म्हणजे 275 पैकी 199 गुण देऊन त्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तबच केले आणि या संघर्षपूर्ण अभ्यासयात्रेचा यशस्वी शेवट झाला.

 

प्रस्तावनेच्या शेवटाकडे येताना एका महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष वेधावेसे वाटते. अन्सारमध्ये अशा कोणत्या क्षमता, गुणवैशिष्ट्ये होती ज्यामुळे तो पहिल्या प्रयत्नातच आणि वयाच्या 21 व्या वर्षी आयएएस झाला? या दृष्टीने त्याच्या एकंदर प्रवासाचा विचार करता ठळकपणे लक्षात येणारी पहिली बाब म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची त्याची जिद्द होय. खरे पाहता, आपल्या समाजातील अनेकांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र बहुतांश मुलांना विपरित परिस्थितीमुळे अर्थपूर्ण पर्यायच उपलब्ध होऊ शकत नाहीत. अन्सारने मात्र घुसमटून टाकणाच्या परिस्थितीवर शिक्षणाचा उतारा शोधला. वाचनाची आवड, शिक्षकांशी मैत्री, विविध स्पर्धातील सहभाग व मिळणारी पारितोषिके या माध्यमातून शिक्षणाला आधार बनवले. त्यामुळे प्राथमिक टप्प्यावर त्याची जी पायाभूत जडणघडण झाली (वाचनामुळे येणारी समज, विविध स्पर्धांमधील सहभागामुळे आलेले धाडस, पारितोषिकांमुळे वाढणारा आत्मविश्वास आणि पुढे जायची उर्मी), त्याचा पुढील वाटचालीत लक्षणीय फायदा झाला, यात शंका नाही.

 

अन्सारने ध्येयाप्रती राखलेली निष्ठा आणि सचोटी हे त्याच्या यशामागील आणखी एक महत्त्वाचे कारण होय. आपण पुढे काय करावे ?, कोणत्या टप्प्यावर त्यासंबंधी निर्णय घ्यावा? निर्णयानंतर उद्दिष्ट गाठण्यासाठी नेमकी काय व कशी तयारी करायची?, या आणि अशा अनेक प्रश्नांचा सामना सर्व विद्यार्थ्यांनाच करावा लागतो. अन्सारने याबाबतीत टप्प्याटप्प्याने विचार करून ध्येय निश्चित केले आणि लक्ष विचलित होऊ न देता आपली सर्व ऊर्जा निर्धारित ध्येय गाठण्यावर केंद्रीत केली. दहावीत चांगले गुण प्राप्त करून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला जाण्याचा निर्णय आणि युपीएससी करण्याचे ठरवल्यानंतर इतर कोणत्याही परीक्षांचा विचार न करता केवळी युपीएससीवर लक्ष केंद्रीत करण्याचे धोरण याबाबीतून त्याची नेहमीच 'फोकस्ड राहण्याची वृत्ती' दिसून येते. युपीएससीसाठी ही वृत्ती किती महत्त्वाची आहे आणि त्याने ही वृत्ती कशी जोपासली, याचे दाखले पुस्तकातून मिळतीलच. खरेतर पुण्यासारख्या महानगरातील विविध प्रलोभने,

 

पालवणाऱ्या आकांक्षा हलाखीच्या परिस्थितीमुळे पूर्ण करता येत नाहीत म्हणून निर्माण होणारे ताणेबाणे, भोवतालची जीवघेणी स्पर्धा अशा स्थितीत आपले मनोधैर्य टिकवून ध्येयाशी एकनिष्ठ राहणे अत्यंत अवघड काम होते. मात्र, अन्सारने ही वृत्ती जोपासल्यामुळेच हा खडतर प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करता आला. या संदर्भात मुद्दाम नमूद करायला हवी अशी एक बाब म्हणजे त्याची सकारात्मक वृत्ती बऱ्याचदा घरची प्रतिकूल परिस्थिती, त्यामुळे बसणारे चटके, आयुष्यात येणारे कटु अनुभव, परिणामी झालेली कोंडी इ. मुळे कोणत्याही व्यक्तीच्या मनात एक प्रकारची नकारात्मकता आणि कडवटपणा निर्माण होणे स्वाभाविक असते. तथापि, अन्सारने असे होऊ न देता, नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच अभ्यास केला.



प्रयत्नातील 'सजगता' आणि 'सातत्य' ह्या त्याच्या गुणवैशिष्ट्यांतील दोन मध्यवर्ती बाबी होत. यूपीएससीची तयारी सुरू केल्यानंतर जी अभ्यासप्रक्रिया हाती घेतली (म्हणजे ज्या पद्धतीने अभ्यास केला) त्यास मी 'सजगपणे केलेला अभ्यास मानतो. आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहोत तिचे नेमके स्वरूप काय? ती उमेदवाराकडून नेमकी कशाची अपेक्षा बाळगते ?, आपल्याकडे त्यांची पूर्तता करण्याची क्षमता आहे का?, सद्यस्थितीत कोणत्या क्षमता आहेत आणि कोणत्या विकसित कराव्या लागतील ?, त्यासाठी नेमका काय व कसा अभ्यास करायचा?, या सर्व बाबींचे पद्धतशीर होमवर्क' करून त्याने अभ्यास प्रक्रिया राबवली. त्याने कधीच निष्क्रियपणे अभ्यास केला नाही. पुढील एका प्रकरणात म्हटल्याप्रमाणे 'हार्ड वर्क विथ 'फोकस' हीच त्याच्या स्मार्ट बर्क'ची परिभाषा होती. मराठी माध्यमातून परीक्षा देणार असला तरी त्याने जाणिवपूर्वक इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. त्यामुळे मराठीबरोबरच दर्जेदार इंग्रजी संदर्भाचा आधार घेता आला. द हिंदू'सारख्या इंग्रजी भाषेतील दैनिकाचे सातत्यपूर्ण वाचन केले. पूर्व मुख्य परीक्षेच्या बाबतीत सराव चाचण्यांद्वारे आणि मुलाखतींच्या बाबतीत अभिमत मुलाखतीद्वारे मुल्यांकन करून आपली तयारी प्रभावी बनवली. अर्थात, या सजगतेबरोबरच अंगी बाणवलेली आणखी एक बाब म्हणजे तीन वर्षे चाललेल्या अभ्यासप्रक्रियेत राखलेले सातत्य होय. कोणत्याही कारणामुळे अभ्यासात खंड पडणार नाही याची खबरदारी कशी घेतली, हे पुस्तकातून लक्षात येईलच.

 

अन्सारने केलेल्या या सजग आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे त्याला एक कळीची क्षमता प्राप्त करता आली. ती म्हणजे केवळ युपीएससीच्याच बाबतीत नव्हे तर एकंदर समाजाकडे बघण्याची योग्य 'समज.. (Understanding) होय. युपीएससी परीक्षा, विशेषतः त्यातील मुलाखतीच्या टप्प्याद्वारे उमेदवाराची भोवतालाविषयीची समजच (आकलन) पाहिली जाते. अन्सारने या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन, पुस्तकात समाविष्ट केलेली त्याची मुख्य परीक्षेवरील उत्तरे आणि आयोगाच्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची दिलेली उत्तरे, यातून त्याने अल्प वयात प्राप्त केलेल्या या क्षमतेची प्रत्येकाला साक्ष पटेल. कष्टपूर्वक आत्मसात केलेल्या या क्षमतेने त्याच्या यशात निर्णायक भूमिका बजावली ही बाब वादातीत आहे.

 

                                     तुकाराम जाधव 
UPSC मी आणि तुम्ही : प्रस्तावना UPSC मी आणि तुम्ही : प्रस्तावना Reviewed by Aslam Ansari on June 08, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.